Solapur Blood Shortage : सोलापुरातील पेढ्यांमध्ये सुमारे ५० टक्क्यांपर्यंत रक्ताचा तुटवडा

रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्याने रक्तसाठा घटला असून, काही रक्तगटांमध्ये मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याचे चित्र
Blood Shortage
Blood Shortage pudhari photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : दिवाळीचा सण, सलग सुट्ट्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली घट याचा थेट परिणाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रक्तसंकलनावर झाला आहे. सध्या विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्याने रक्तसाठा घटला असून, काही रक्तगटांमध्ये मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याचे चित्र आहे. सध्या रक्तपेढ्यांमध्ये सुमारे ५० टक्क्यांपर्यंत रक्ताची कमतरता जाणवत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांसमोर रक्ताची व्यवस्था करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

इतर काळात अनेक सामाजिक संस्था, मंडळे, शैक्षणिक संस्था, उद्योग-व्यावसायिक संस्था आणि विविध संघटनांकडून नियमितपणे रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सार्वजनिक कार्यक्रमांची संख्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम रक्तसंकलनावर झाला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी किंवा नातेवाईकांकडे बाहेरगावी जातात. अनेक जण सणाच्या काळात घराबाहेर पडणे टाळतात. त्यामुळे नियमित रक्तदातेही रक्तदानासाठी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. वर्षभर रक्तदान करणाऱ्या अनेक नियमित दात्यांकडून या कालावधीत रक्तदान होत नसल्याने रक्तपेढ्यांवरील ताण वाढला आहे.

दुसरीकडे, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रुग्णालयांमध्ये नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. सुट्ट्यांच्या काळात अनेक रुग्ण नियोजित उपचार आणि ऑपरेशन करून घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या रक्ताची मागणी वाढली आहे. रक्ताची मागणी वाढत असताना रक्तसंकलन मात्र कमी झाल्याने उपलब्ध साठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

रक्‍तदानाची आवश्यकता

सध्या निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सामाजिक संस्था, युवक मंडळे, गणेश मंडळे, विविध संघटना, उद्योग-व्यावसायिक संस्था आणि महाविद्यालयांनी तातडीने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची गरज आहे. दिवाळीनंतर रक्तदान शिबिरांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर झाल्यास रक्तसाठा पूर्वपदावर आणण्यास मदत होऊ शकते.

दिवाळी सुट्ट्यांमुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच रक्‍तदान शिबिरे बंद आहेत. सुट्ट्यांमुळे रक्‍तदान करणारे नागरिकही बाहेर पडत नसल्याचे दिसते. यामुळे सोलापूर शहरात ५० टक्‍के रक्‍ताचा तुटवडा जाणवत आहे. त्‍यासाठी नागरिकांनी उत्‍स्फूर्तपणे रक्‍तदान करण्याची गरज आहे.
- खुशाल देढीया, सचिव, रेडक्रॉस सोसायटी, सोलापूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.