

सोलापूर : भारत माता की जयचा जयघोष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे चिन्ह असलेले कटआऊट, शहराच्या विविध भागातून आलेल्या हजारो लाडक्या बहिणींची गर्दी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाराबंदी वेशातील तडाखेबाज एन्ट्री अशा भारावलेल्या वातावरणात भारतीय जनता पक्षाची विजयी संकल्प सभा पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहराला दररोज पाणीपुरवठा आणि लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार असल्याचे सांगत सोलापूरकरांची मने जिंकली.
महापालिका निवडणुकीसाठी हजारो सोलापूरकरांच्या गर्दीत शनिवारी (दि. 10) हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प सभा झाली. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, आ. समाधान आवताडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, माजी आ. सर्वश्री दिलीप माने, प्रशांत परिचारक, राम सातपुते, राजेंद्र राऊत, नरसिंग मेंगजी, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, रामचंद्र जन्नू, सुधा अळ्ळीमोरे, डॉ. शिवराज सरतापे, पांडुरंग दिड्डी, प्रा. मोहिनी पत्की, मोहन डांगरे, श्रीनिवास दायमा, रुद्रेश बोरामणी, अंबादास बिंगी, विजय कुलथे, डॉ. आदर्श मेहता, कुमुद अंकाराम, ॲड. साधना संगवे, लक्ष्मण गायकवाड, श्रीनिवास दासरी, देविदास बनसोडे, देविदास जंगम, देवेंद्र भंडारे आदी उपस्थित होते.
हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर या सभेसाठी तीन मंडप उभारण्यात आले होते. एका मंडपात सुमारे दहा हजार लोकांच्या आसनाची व्यवस्था होती. सकाळी 11 वाजल्यापासून मैदानावर गर्दी होण्यास सुरुवात झाली. आ. देवेंद्र कोठे हे व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व सभेची सूत्रे त्यांच्याकडे असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री फडणवीस येण्याअगोदर आ. देवेंद्र कोठे तसेच शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर या दोघांनी भाषणे केली. परंतु वेळेअभावी इतर आमदारांना भाषणाची संधी मिळाली नाही.
दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांचे बाराबंदी वेशात व्यासपीठावर आगमन झाले. यावेळी देवाभाऊंच्या नाऱ्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी सोलापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला. सोलापूरचा पाणीप्रश्न, विमानसेवा, आयटी पार्क, एमआयडीसीतील सुविधा, प्राणीसंग्रहालय, परिवहन सेवा, पर्यटन, महामार्गांचे जाळे आदी विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाशझोत टाकला.
महापौर भाजपचाच होणार - पालकमंत्री
सोलापूरकरांनी आजवर ज्या-ज्या योजना, प्रकल्प, निधी मागितला ते सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यामुळे सोलापूरचा चौफेर विकास होत आहे. सोलापूरचे भविष्य ठरविणारी ही निवडणूक आहे. पुढील महापौर भाजपचाच होणार यात शंका नाही. सोलापुरातील सर्व लाडक्या बहिणींनी आणि सोलापुरकरांनी भाजपच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.