

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर भाजप कार्यालयात भाजपचे दोन्ही देशमुख आमदार एकत्रित येऊन अभिवादन केले. यावेळी मनपा निवडणूक प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासह आदी उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडवर आले असून, भाजपमधील संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठी रघुनाथ कुलकर्णी यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. रोहिणी तडवळकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर देशमुख गटात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे सोशल मीडियावर एकमेकांवर कार्यकर्त्यांनी टिका-टिप्पणी केली होती. दोन्ही देशमुख आणि शहराध्यक्षा तडवळकर या एकाच व्यासपीठावर दिसले नव्हते.
परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी दोन्ही देशमुख आमदार शहर कार्यालयात एकत्रित आले. दरम्यान, डॉ. आंबेडकर चौक येथील पुतळ्यास दोन्ही देशमुख, तडवळकर यांनी एकत्रित येऊन पुष्पांजली अर्पण केली.