

सोलापूर : भारतीय जनता पार्टीने लोकशाही बचाव, अराजकता हटाव, देश बचाव या अभियानांतर्गत बुधवारी (दि. ४) सोलापुरात विराट मोर्चा काढला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या मोर्चातून भाजपने राजकीय शक्तिप्रदर्शन करत विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली.
देशातील लोकशाही व्यवस्था, संविधानिक संस्था आणि निवडणूक प्रक्रियेबाबत विरोधकांकडून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप भाजपने केला. या पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या संरक्षणाचा नारा देत मोर्चाच्या माध्यमातून पक्षाने आपली भूमिका मांडली.
मोर्चात आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. राजेंद्र राऊत, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. समाधान आवताडे, आ. देवेंद्र कोठे, माजी आमदार प्रशांत परिचारक, राजन पाटील, दिलीप माने, नरसिंग मेंगजी, दीपक साळुंखे-पाटील, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापालिकेतील गटनेते नरेंद्र काळे, माजी महापौर कांचना यन्नम, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, शहाजी पवार, नगरसेवक, जि. प. पदाधिकारी सहभागी झाले होते.
पदयात्रेने शहर जाम
भाजपच्या रेकॉर्डब्रेक पदयात्रेमुळे सोलापूर शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. मेकॅनिक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाळीवेस आणि स्टेशन रोडसह प्रमुख मार्गांवर वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
पर्यायी मार्गांवरही कोंडी
वाहतूक कोंडीमुळे काही वाहनांना जुनी मिल मैदानातून, तर काहींना निराळे वस्ती मार्गे जावे लागले. मात्र, पर्यायी मार्गांवरही गर्दी कायम राहिल्याने वाहतूक अजूनही विस्कळीतच होती. रुग्णवाहिकेलाही वाट काढताना कसरत करावी लागली.