

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मं) येथील विकास सेवा सोसायटीतून थेट शेजारच्या कर्नाटकातील एका व्यक्तीच्या नावे ठराव पाठवण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा आक्षेप भाजपाच्या नेत्यांकडून घेण्यात आल्याने भाजपमधील गृहकलह चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. त्याआधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाविरोध भाजपच लढा होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. निवडणुकीसाठी एकूण २ हजार १६५ ठराव दाखल झाले असून त्यावर दाखल झालेल्या हरकतींमुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि वर्चस्वाचा लढा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील १४ संस्थांच्या ठरावांवर स्वतः भाजपच्याच कार्यकर्त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.
निर्णयाकडे सोलापूरचे लक्ष
डीसीसी बँकेच्या या राजकीय साठमारीत पक्षातीलच निष्ठावंत विरुद्ध बोगस ठराव असा सामना रंगला आहे. सत्ता मिळवण्यासाठी परराज्यातील व्यक्तींचा वापर करण्यापर्यंत मजल गेल्याचे आरोप होत असल्याने निवडणूक प्राधिकरणाकडे नोंदवलेल्या या हरकतींवर काय निर्णय होतो, आणि भाजप श्रेष्ठी या अंतर्गत वादावर कसा पडदा पाडतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बोगस ठरावांवर तीव्र हरकत
संबंधित व्यक्ती गावातील रहिवासी नाही, सोसायटीची सभासद किंवा कर्जदार नाही आणि तिच्या नावावर गावात कोणतीही शेतजमीन नाही, तरीही त्यांच्याकडून ठराव घेण्यात आल्याचा आरोप करत या ठरावावर तीव्र हरकत घेण्यात आली आहे.
माजी संचालक विरुद्ध स्थानिक नेते
वर्चस्वाचा लढा दक्षिण सोलापूर तालुक्यातून माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्या समर्थकांचे बँकेसाठी मोठ्या प्रमाणावर ठराव झाले आहेत, ज्यांना अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यातील तब्बल १४ ठरावांवर भाजपच्याच दुसऱ्या गटाने हरकती घेऊन हा बनाव मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.