

Daughter-in-law and Father-in-law Deaths in Bitargav Solapur
करमाळा : सुनेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सासऱ्याचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आठवडाभराच्या कालावधीत सुनेच्या मृत्यूनंतर सासऱ्याचा मृत्यू झाल्याने बिटरगावात शोककळा पसरली आहे. तर सून सासऱ्याच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
लालासाहेब विनायक मुरूमकर (वय ६१, रा. बिटरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या सासऱ्याचे नाव आहे. मागील आठवड्यामध्ये कुटुंबासह शेतातील विंधन विहिरीची मोटार दोरीच्या साह्याने काढण्याच्या प्रयत्नात सून मनीषा नितीन मुरूमकर (वय ३४) हिचा दोरी तुटून लाकडाचा जोरदार फटका डोक्यात बसल्याने मृत्यू झाला होता.
या अकस्मात व दुर्दैवी घटनेने संपूर्ण कुटुंब कोसळून गेले होते. याच अवस्थेत दशक्रिया विधी होण्याच्या आधीच लालासाहेब मुरूमकर यांना मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. या आठवडाभराच्या दरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेने बिटरगाव येथे शोककळा पसरली आहे. लालासाहेब मुरूमकर हे बिटरगाव विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन होते. त्यांच्यावर बिटरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, दोन बहिणी, एक मुलगा, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.