

सोलापूर : जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या मोटारसायकल चोरी, कॉपर वायर चोरी आणि जनावर चोरीच्या एकूण सहा गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन मोटारसायकली, सुमारे ५० किलो कॉपर व रोख रक्कम असा एकूण एक लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कारवाई केली. २३ सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड व त्यांच्या पथकाला अकलूज शहरात संशयित व्यक्ती चोरीच्या मोटारसायकलीसह फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून दत्तू सुरेश चव्हाण (वय २१) व शंकर विजय चव्हाण (२२, दोघे रा. सवतगाव, माळशिरस) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी साथीदार सुरेश राजू चव्हाण, राहुल रमेश चव्हाण आणि रोहित पवार (सर्व रा. सवतमाव, माळशिरस) यांच्या मदतीने त्यांनी या चोऱ्या केल्याचे सांगितले. कारवाईत दोन मोटारसायकली, ५० किलो कॉपर वायर आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे, प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात राहुल गरड, संजय देवकर, तानाजी मुदगल, हनीफ शेख, सूरज रामगुडे, रतन जाधव, विनायक घोरपडे, सागर ढोरे पाटील, कपिल काटकर यांनी केली.
आरोपींनी साथीदारांच्या मदतीने ६१ फाटा, माळशिरस व सोलापूर-विजापूर मार्गावरील विविध ठिकाणांहून मोटारीची कॉपर केबल चोरी करून भंगार विक्रेत्यांना विकली. मागील दोन-तीन महिन्यांत कळंबजवळील परिसरातून ३ शेळ्या, २ पाटे तसेच तेंभुर्णी परिसरातील शेतातून ३ शेळ्या, ३ बोकड व २ पाटी चोरल्याची कबुली दिली आहे. चोरी केलेली जनावरे विकल्यानंतर मिळालेल्या रकमेतून दत्तू चव्हाण याला २६ हजार रुपये आणि शंकर चव्हाण याला १६ हजार रुपये मिळाल्याचे तपासात समोर आले.