

सोलापूर : सोलापुरातील विडी उद्योग गंभीर संकटात सापडला आहे. ग्राहकांच्या संख्येत झालेली घट, शासकीय धोरणे आणि इतर कारणांमुळे 25 हजार महिलांच्या उदरनिर्वाहावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. एकेकाळी दररोज तीन ते चार कोटी विड्या तयार करणाऱ्या सोलापुरात सध्या सव्वा कोटी विड्या तयार होत आहेत. विडी उद्योगाच्या या उतरणीला राजकीय अनास्थाही तितकीच कारणीभूत असल्याचे दिसते.
राज्यात विडीचे सर्वात जास्त उत्पादन सोलापुरात होते. सोलापुरात दररोज एक कोटी 30 लाख ते एक कोटी 40 लाख विड्या तयार होतात. राज्यातील 50 टक्के विडी उत्पादन एकट्या सोलापुरात होते. 14 विडी कारखान्याच्या माध्यमातून 25 हजार महिलांच्या हाताला सध्या काम आहे. एकेकाळी हाच आकडा साठ हजाराच्या पुढे होता. परंतु तंबाखू नियंत्रण तसेच धूम्रपान विरोधी कायद्यातील जाचक अटींमुळे विडी उद्योग संकटात सापडण्यास सुरुवात झाली. विडीसाठी लागणारा कच्चा माल असलेल्या तंबाखूवर 40 टक्के जीएसटी, तेंदूपत्त्यावर पाच टक्के जीएसटी द्यावी लागते. विडी तयार झाल्यानंतर त्यावर 10 टक्के एक्साईज ड्युटी, 18 टक्के जीएसटी आणि एक टक्का एनीसीसीडी टॅक्स द्यावा लागतो. त्यातच विडी कामगार महिलांना द्यावा लागणारा मोबदलाही वाढला. त्यामुळे विडीच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली.
सोलापुरात एका विडी कामगार महिलेला पी.एफ, ग्रॅज्युइटी, बोनस मिळून 295 रुपये देण्यात येतात. त्यानुसार एका महिलेच्या हातात सर्वसाधारण 230 रुपये येतात. महाराष्ट्र हे विडी कामगार महिलांना सर्वाधिक मानधन देणारे राज्य आहे. परंतु इतर राज्यात एका महिलेस 125 रुपयांपासून 170 रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. यामुळे इतर राज्यातील विडीची किंमत कमी आहे. याचा परिणाम सोलापुरातील विडी कारखानदारांवर होत आहे. पश्चिम बंगालमधील विडी तसेच नकली विडीमुळेही राज्यातील विडी उद्योग संकटात आहे.
विडी उद्योग संकटात येण्याची कारणे
कठोर कायदे : केंद्र सरकारच्या तंबाखू नियंत्रण कायद्यांमुळे (कोटपा) विडीच्या पाकिटांवर चेतावणीची मोठी चित्रे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जीएसटी आणि कर : विडीवर लादण्यात आलेला उच्च जीएसटी आणि उपकर यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे.
विडी ओढणाऱ्यांच्या संख्येत घट : लोकांमध्ये आरोग्याबाबत वाढलेली जागरूकता आणि व्यसनमुक्तीच्या मोहिमांमुळे विडी ओढणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
पर्यायी उत्पादने : बाजारात सिगारेट, ई-सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे विडीची मागणी दिवसेंदिवस कमी होत आहे.
कच्च्या मालाची टंचाई : तंबाखू आणि विडी वळण्यासाठी लागणाऱ्या तेंदूपत्त्याच्या किंमती वाढल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
नकली विडीचा सुळसुळाट : कमी खर्चात तयार केलेल्या नकली विडींमुळे अधिकृत विडी कारखानदार अडचणीत सापडले आहेत.