

नरखेड ः मोहोळ तालुक्यात सीना-भोगावती नदीच्या काठावर असलेल्या भोयरे गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या मंदिरावर उभे असलेले आणि मंदिराच्या खालील बाजूला उभे असणाऱ्या भाविकांकडून दगड मारून धुळवड साजरी झाली. सुमारे 300 वर्षापासून आजही तितक्याच मोठ्या उत्साहात साजरी करीत ग्रामस्थांकडून जोपासली जात आहे.
मोहोळ- वैराग रोडपासून आतील बाजूस सीना भोगावती नदीच्या तीरावर भोयरे हे गाव वसलेले आहे. या गावचे ग्रामदैवत श्री जगदंबा देवी असून शेकडो वर्षांपूर्वी उंच टेकडीवर देवीचे हे मंदिर दगडात बांधण्यात आलेे आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी, बिटले (ता. मोहोळ) येथील देवी व भोयरे येथील जगदंबा देवी या सख्ख्या तीन बहिणी असल्याची अख्यायिका आहे. या देवीची यात्रा पौष्य महिन्यात भरते. परंतु धुळवडीदिवशी या ठिकाणी देवीच्या मंदिरावरून गावातील मुख्य चौक असलेल्या साखरबाई चौकात उभ्या असलेल्या भाविकांना तर चौकातील भाविक मंदिरावर उभ्या असलेल्या भाविकांना दगड मारून धुळवड साजरी करतात. हा दगड मारण्याचा प्रकार सुमारे अर्धा ते पाऊण तास चालला. या दगडफेकीच्या कार्यक्रमापूर्वी गावातील सर्व जाती धर्मातील, सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते मतभेद न मानता दुजाभाव, द्वेषाची भावना न ठेवता जगदंबा देवीचे भक्त म्हणून मंदिरात एकत्रित येऊन दर्शन घेतात. मंदिरातून आई राजा उदे उदे च्या गजरात वेशीत असलेल्या हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात आले. भोगावती नदीच्या पात्रात जाऊन हालग्याच्या कडकडाटात कुस्त्यांचा फड रंगला. त्यानंतर देवीचा छबिना गावाच्या वेशीत आल्यावर हनुमान मंदिरापाठीमागे आल्यावर भाविकांत दोन गट निर्माण होऊन एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली.