Solapur Theft: भोसे परिसरातील महावितरण कंपनीच्या साहित्यांची चोरी

अधिकारी, कर्मचारी अनभिज्ञ : लाखो रुपयांच्या साहित्यावर खासगी ठेकेदारांचा डल्ला?
Solapur Theft: भोसे परिसरातील महावितरण कंपनीच्या साहित्यांची चोरी
Published on
Updated on

भोसे (क.) : महावितरण कंपनीकडून ग्राहकांसाठी उभ्या करण्यात आलेल्या ११ केव्ही उच्च दाब वीज वाहिन्यांच्या लाखो रुपयांच्या साहित्यांची चोरी झाली आहे. मात्र याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कसलीही माहिती नसल्याचे दिसून आले. तर बंद असलेल्या वीज वाहिनीवरील साहित्य काढून तेच साहित्य दुसऱ्या कामावर वापरून त्याची बिले उचलण्याचा पराक्रम पंढरपूर तालुक्यातील काही ठेकेदारांनी सुरू केला असल्याची चर्चा परिसरातील ग्रामस्थांतून सुरू आहे.

पंढरपूर तालुक्यातील शेवते येथील ३३ /११ उपकेंद्र अस्तित्वात येण्यापूर्वी शेवते गावाला पटवर्धन कुरोली उपकेंद्रातून ६ किमी अंतराच्या भगीरथ वाहिनीद्वारे वीज पुरवठा होत होता. कालांतराने शेवते येथे ३३ / ११ उपकेंद्र मंजूर होऊन कार्यान्वित झाले. त्यानंतर पटवर्धन कुरोली- शेवते ही भगीरथ वीज वाहिनी बंदच राहिली. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी या वीज वाहिनीच्या वीजवाहक तारा गायब केल्या आहेत.

त्याचबरोबर शेवते वीज उपकेंद्रातून खेडभोसे गावाला ६ किमी अंतरावर नवीन वीजवाहिनी टाकून अशाच प्रकारे भगीरथद्वारे जोडणी दिली होती. कालांतराने भोसे उपकेंद्रातून खेडभोसे गावाला भगीरथ वीजपुरवठा सुरू करण्यात आला. परिणामी शेवते - खेडभोसे ही वीजवाहिनी सुस्थितीत असूनही बंद राहिली. त्यानंतरच या ११ केव्ही उच्च दाब वाहिनीच्या वीजवाहक तारा गायब झाल्या आहेत.

करकंब येथेही सुमारे ११ किमी अंतराच्या वीजवाहिनीची साहित्यांची अशाच प्रकारे चोरी झाली आहे. दुसरीकडे महावितरण कंपनीच्या खासगी ठेकेदारांनी महावितरण कंपनीलाच पद्धतशीरपणे चुना लावण्याचा एक कलमी कार्यक्रम पंढरपूर तालुक्यात राबविलेला दिसून येत आहे. सुस्थितीत असलेल्या मात्र या - ना त्या कारणांमुळे बंद असलेल्या अनेक ११ केव्ही उच्च दाब वाहिन्यांच्या ॲल्युमिनियमच्या तारा या ठेकेदारांकडून दिवसाढवळ्या काढून त्या स्वतःच्या ठेका घेतलेल्या कामावर वापरण्यात येत आहेत.

मात्र दुसरीकडे त्या वीजवाहक तारा खुल्या बाजारातून विकत घेतल्या असल्याचे दाखवून अव्वाच्या सव्वा बिले लावून महावितरण कंपनीकडून बिले उकळण्याचा प्रकार सुरू आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना महावितरण कंपनीचे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले असल्याचे दिसून येते. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय हे खासगी ठेकेदार अशा वीज वाहिन्यांवरील साहित्य चोरू शकत नाहीत. मात्र हा चोरीचा मामला सर्वसंमतीने सुरू असून महावितरण कंपनीला पद्धतशीरपणे गंडा घालण्याचे काम महावितरण कंपनीचे अधिकारी- कर्मचारी आणि ठेकेदारांमध्ये सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news