

सोलापूर : तुळजापूर रोडवरील भोगाव कचरा डेपोतील दोन मोठ्या ढिगाऱ्यांना लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. आणखी दोन दिवस हे ऑपरेशन सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अग्निशमन विभागाचे अधीक्षक राकेश साळुंखे यांनी दिली.
तुळजापूर रोडवरील कचरा डेपोतील दोन मोठ्या ढिगाऱ्यांना सोमवार, दि. 4 मे 2026 रोजी दुपारी दुपारी 4.22 वाजता भीषण आग लागली होती. वाढत्या तापमानामुळे आणि अतिउष्णतेमुळे ही आग लागल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधीक्षक साळुंखे हे घटनास्थळी दाखल झाले होते.
अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या साह्याने आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर जवानांनी प्रयत्न केले. सोमवार आणि मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 60 गाड्या पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. अखेर ही आग आटोक्यात आणली आहे. थोड्या प्रमाणात धूर निघत आहे. अग्निशमन दलाचे अधीक्षक साळुंखे हे घटनास्थळी तळ ठोकून होते. त्यांनी कार्य कुशलतेने आग दीड दिवसात आटोक्यात आणली.
आग आटोक्यात आली, निखाऱ्यांमुळे धुमसते
आग आटोक्यात आली तरीही त्याठिकाणी ढिगाऱ्याखाली निखारे असू शकतात. खालची आग दिसत नाही. धग असते. त्यावर वारा लागला की पुन्हा ती पेटते. धूर आणि उष्णता आहे, तिथे पाणी मारून तो भाग थंड केला जातो. त्याला कुलिंग ऑपरेशन म्हणतात. साधारणत: दोन दिवस पाणी मारून हा परिसर थंड ठेवण्यात येणार आहे.