Solapur : श्रावण महिन्यात सोलापुरात भरणार भक्तीचा मेळा
सोलापूर ः सोलापूर शहर हे शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या कार्यामुळे भू-कैलास म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात सोलापुरात भक्तीचा मळा फुलणार आहे. श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकासह महाराष्ट्रातील शिवभक्तांंची गर्दी असते. त्यानिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
गुरुवार, दि. 24 जुलै रोजी अमावास्या असून, शुक्रवार, दि. 25 जुलै रोजी श्रावण महिन्यास प्रारंभ होणार आहे. यंदा श्रावण महिन्यात चार श्रावण सोमवार आले असून, चारही श्रावण सोमवारी सिद्धेश्वर मंदिरातील योगसमाधीस आकर्षक फुलांची मेघडंबरीने सजावट केली जाते. सिद्धेश्वर मंदिरात सकाळी श्रींच्या मूर्तीस आणि योगसमाधीस अभिषेक, रुद्राभिषेक, पारायण, पान पूजा, तांदूळ पूजा असे धार्मिक विधी होणार आहेत. मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनरांगेची व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी बॅरिकेडस्ची व्यवस्था केली जात आहे.
मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव
श्रावण महिन्यात विविध समाजाच्या वतीने रथोत्सव मिरवणूक निघत असते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी मार्कंडेय महामुनींची सिद्धेश्वर पेठ येथील मंदिरापासून मिरवणूक निघते. यादिवशी पद्मशाली समाजातील भाविक मार्कंडेय महामुनींचे दर्शन घेऊन सुताची राखी म्हणजे जानवे बांधून घेतात. तसेच नीलकंठेश्वर रथोत्सव मिरवणूक निघते.

