

बार्शी : बार्शी शहरात गेल्या महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे १५ ते १७ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. या असह्य परिस्थितीविरोधात आणि सुधारित २९६ कोटींची पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बार्शी नगरपरिषदेतील विरोधी पक्षाच्या २१ नगरसेवकांनी बुधवारी उपोषण सुरू केले. दरम्यान, सायंकाळी उशिरा नगरपालिका प्रशासनाने २१ दिवसांची मुदत मागत ७ दिवसांआड तर २१ दिवसांनंतर ५ दिवसांआड पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले.
या आंदोलनात ज्येष्ठ कामगारनेते तानाजी ठोंबरे, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल,विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांच्यासह विरोधी नगरसेवक सहभागी झाले होत. यावेळी तहसीलदार एफ. आर. शेख, निवासी नायब तहसीलदार एस. व्ही. बदे, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, विठ्ठल पाटोळे, सानप, जलदय अभियंता अंकिता एकबोटे उपस्थित होते.
आंदोलकांच्या २९६ कोटींची योजना युद्धपातळीवर पूर्ण करावी, राष्ट्रीय महामार्गाची परवानगी व प्रलंबित पाईपलाईनचे काम तातडीने करावे, टंचाई काळात टँकर संख्या वाढवून प्रत्येक टँकरला जीपीएस बसवावा, कंदर, कुर्डुवाडी व बार्शी येथे फ्लोमीटर बसवावे, लिक डिटेक्शन सिस्टमने गळती शोधावी, प्रत्येक प्रभागाचे वेळापत्रक जाहीर करावे, अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा आणि जलदाय विभागातील रिक्तपदे भरावीत या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.