

बार्शी : बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून दोन सराईत वाहनचोरांना अटक केली असून त्यांच्याकडून ४ बुलेटसह एकूण १० मोटार सायकली जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत ८ लाख २० हजार रुपये आहे.
बार्शीतील राऊत चाळ, स्टेशन रोड येथील प्रतिक चंद्रकांत पवार यांची बुलेट (क्र. एमएच २५ एवाय २४७६) ही घरासमोरून चोरीला गेली. याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आकाश हरीचंद्र राठोड (वय १९, रा. कन्हेरगाव, ता. परळी, जि. बीड) आणि ऋषिकेश महादेव सुरवसे (वय २१, रा. मांजरी, ता. जि. लातूर) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून बार्शीतून चोरी झालेली बुलेटसह पुणे, लातूर, येडशी, इंदापूर व इतर भागांतून चोरी केलेल्या एकूण १० दुचाकी जप्त करण्यात आल्या.
जप्त वाहनांमध्ये ४ बुलेट, ५ दुचाकी यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गणेश कुंभार यांच्या नेतृत्वात पोसई अभयकुमार माकणे, पोहेकॉ प्रविण साठे, सुनील बनसोडे, शबाना कोतवाल, सतीश उघडे, सचिन नितनाथ, सचिन राऊत पथकाने केली.