

सोलापूर : बार्शी, लातूरसह मराठवाडा या भागातून अनेक रेल्वेगाड्या रेल्वे प्रशासनाकडून हडपसरपर्यंत सोडतात. तिथे या गाड्या थांबवले जातात. या गाड्या पुणे स्टेशनपासून लांब थांबवल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याही गाड्यांना पुणे स्थानकापर्यंत सोडले जात नसल्याचा फटका जिल्ह्यातील बार्शीसह मराठवाड्यातील प्रवाशांना बसतो. वास्तविक या गाड्या पुढे खडकी पिंपरी-चिंचवडपर्यंत सोडल्यास प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
जिल्ह्यातील बार्शी व मराठवाड्यातील विविध ठिकाणावरून धावत असलेल्या रेल्वेगाड्या हडपसरलाच थांबवले जातात. येथून पुढे पुणे शहरातील अन्य ठिकाणी प्रवाशांना जावे लागते. यासाठी यांना किमान 30 किमी अंतर रिक्षाने जावे लागते. यासाठी प्रवाशांना तीनशे रुपयाहून अधिक खर्च करावा लागतो. शिवाय, दोन ते तीन तासाहून अधिक वेळही वाया जातो. या गाडीने पुण्यात जाणारे विद्यार्थी, कामगार, रुग्ण व महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
देशातील अन्य ठिकाणावरून येणाऱ्या सर्वच रेल्वे पुणेच्या स्टेशनपर्यंत नियमितपणे धावतात. अन्य ठिकाणावरून येणाऱ्या प्रवाशांना एक आणि बार्शी मराठवाड्याला वेगळा न्याय का, असा प्रश्न रेल्वे प्रवाशांमधून विचारला जात आहे. मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी यापूर्वी रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांना बार्शी व मराठवाडा येथून येणाऱ्या रेल्वेगाड्या पुणे स्टेशनपर्यंत चालविण्याची मागणी केली. मात्र, या मागणीकडे अद्यापही रेल्वेकडून महत्त्व दिले गेले नाही. यामुळे, रेल्वेच्या प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. खडकी व पिंपरी चिंचवडपर्यंत गाड्यांचा विस्तार हा व्यवहार्य व समाधानकारक ठरू शकतो.