

सोलापूर : तीन महिन्यांपूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यात वीज पडून शेतकऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या पाळीव जनावरांचा मृत्यू झाला होता. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या या बाधितांना दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने चार शेतकऱ्यांना दोन लाख २० हजार रुपयांचा धनादेश (चेक) सुपूर्द करून दिलासा देण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्तीत जनावरे गमावलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार कासेगाव येथील प्रमोद पाटील यांना गायीच्या नुकसानीपोटी ३७,५००, धोत्री येथील ब्रह्मानंद हिप्परगे यांना गायीसाठी ३७,५००, बक्षीहिप्परगा येथील शिवाजी निकम यांना बैलासाठी ३२,००० आणि कुंभारी येथील अप्पाशा इमडे यांच्या ६ पैकी मृत पावलेल्या ३ म्हशींसाठी एक लाख १२५०० अशी एकूण दोन लाख १९,५०० ची मदत संबंधित शेतकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आली.
तहसीलदारांच्या तत्परतेमुळे मिळाली मदत
आपत्तीच्या वेळी पंचनामे रखडल्याने मदतीस विलंब होण्याचे अनेक प्रकार घडत असतात. मात्र, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी यात विशेष लक्ष घालून कागदपत्रांची पूर्तता वेळेत पूर्ण केली आणि शासनस्तरावरून मदत मंजूर करून आणली.