

बार्शी : शहरातील रुई तलावाजवळील भवानी पेठ परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस काढून ऑटो रिक्षांना विक्री करणाऱ्या टोळीचा पुरवठा विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका इसमाला ताब्यात घेऊन १२,१७८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुरवठा निरीक्षक ज्ञानेश गजाराम कुंटलवाड (वय ३४, रा. बार्शी) यांनी याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे कुंटलवाड यांनी दोन पंचांसह भवानी पेठ समोरील पत्रा शेडवर छापा टाकला. यावेळी तेथे दिनेश विठ्ठल काळे (वय ३४, रा. मांगडे चाळ, बार्शी) हा इसम उपस्थित होता.
तपासणीत त्याठिकाणी तीन रिकामे घरगुती भारत गॅसचे सिलिंडर, एक भरलेला सिलिंडर आणि घरगुती सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्यासाठी वापरला जाणारा विद्युत पंप व नळी आढळून आली. चौकशीत दिनेश काळे याने गेल्या एक महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस काढून तो ऑटो रिक्षा चालकांना जादा दराने विकत असल्याची कबुली दिली.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ६६०० रुपये किंमतीचे तीन रिकामे सिलिंडर (प्रत्येकी २२०० रु.), ३००० रुपये किंमतीचा एक विद्युत पंप आणि २५७८ रुपये किंमतीचा एक भरलेला सिलिंडर (सिलिंडर २२०० रु. + ५.४९ किलो गॅस ३७८ रु.) असा एकूण १२१७८ रुपयांचा मुद्देमाल आहे. या प्रकरणी दिनेश विठ्ठल काळे याच्या विरोधात द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (पुरवठा व वाटप नियंत्रण आदेश)चे उल्लंघन केल्याप्रकरणी अत्यावश्यक वस्तू कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.