

बार्शी : बार्शी शहरात सेवानिवृत्त शिक्षकाच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन व सोन्याचा बदाम तीन चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी मुलगा प्रज्योत कल्याण नांदवटे (रा. राऊत चाळ, विठ्ठल नगर, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रज्योत यांचे वडील कल्याण नांदवटे (वय ६२) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांना दारूचे व्यसन आहे.
आज दि. ३ जून रोजी सकाळी ९ वाजता ते गवत गल्ली येथील विठ्ठल टेलर्सकडे कपडे आणण्यासाठी मोटारसायकलवरून गेले होते. दुपारी १ वाजेपर्यंत घरी न परतल्याने प्रज्योत यांनी वडिलांना फोन केला. त्यावेळी देशी दारू हॉटेलचे मॅनेजर यांनी फोन उचलून सांगितले की, ‘तुमचे वडील जास्त दारू प्यायले आहेत, त्यांना चालता येत नाही. घेऊन जा.’ त्यानंतर १.३० वाजता प्रज्योत व त्यांचा मित्र हॉटेलसमोर पोहोचले. तेव्हा कल्याण नांदवटे हॉटेलबाहेरील कट्ट्यावर बसलेे होते. त्यांच्या गळ्यात सोन्याची चेन दिसली नाही. मुलाने विचारले असता वडिलांनी सांगितले की, तीन अज्ञात इसमांनी चेन चोरल्याचे सांगितले.
हवालदार अमोल माने पुढील तपास करत आहेत.