

सोलापूर : ‘होय, आम्ही झुरळ आहोत’ असे म्हणत भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी युवकांविषयी केलेल्या कथित विधानाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
देशातील कोट्यवधी युवक-युवती आज शिक्षण, रोजगार, महागाई, कंत्राटीकरण, पेपरफुटी, खासगीकरण आणि असुरक्षित भविष्य अशा असंख्य संकटांशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून युवकांची तुलना झुरळांशी करणे ही अत्यंत संतापजनक, अपमानास्पद आणि असंवेदनशील बाब असल्याची प्रतिक्रिया भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने व्यक्त केली. हा केवळ शब्दांचा प्रश्न नाही. हा देशातील तरुण पिढीच्या स्वाभिमानावर केलेला घाव आहे, असे युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम यांनी सांगितले.
आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी पाचारण केले. युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. निवेदनासोबत प्रतीकात्मक झुरळाची प्रतिमाही देण्यात आली.
यावेळी युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण, केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, अश्विनी मामड्याल, नरेश गुल्लापल्ली, अभिजित निकंबे, दिनेश बडगु, चंटी बिटला, राधागोपाल बंडी आदी उपस्थित होते.