

संजय पाठक
सोलापूर : अरब राष्ट्रांतील बहरिन, कुवैत, इराक, कतार, सौदी अरेबिया, दुबई, ओमान या देशांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील केळी मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहेत. यामुळे एकट्या सोलापूर जिल्ह्यातून देशाच्या तिजोरीत तब्बल चार हजार आठशे कोटी रुपये परकीय चलन जमा होत आहे. सोलापूरची केळी अधिक गोड, रुचकर, स्वादिष्ट असून त्यांची लांबी व वजन, त्यामधील आवश्यक पोषक घटक द्रव्ये यामुळे जागतिक मानांकनाच्या निकषात बसतात. त्यामुळेच सोलापुरी केळींना अरब राष्ट्रांत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जळगाव हे केळी उत्पादनात राज्यात अग्रेसर असले, तरी निर्यातक्षम केळी उत्पादनात सोलापूर जिल्हा पुढे असल्याचे निर्यातदारांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात सुमारे 25 हजार हेक्टरवर सध्या निर्यातक्षम केळीची लागवड होते. केळीची लांबी जास्त, भारदस्त वजन, गोडीसह चव समप्रमाणात यामुळे या केळींना जगभरात त्यातही प्रामख्याने अरब राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. साधारणतः दहा ते बारा महिन्यांच्या अंतराने केळीचे पीक काढणीस येते. केळीचे घड काढून शीतगृहात थंड तापमानात सेट होण्यासाठी ठेवण्यात येतात. अस्सल सोलापुरी केळीच्या वाणाची साल जाड असल्याने ती शीतगृहातून बाहेर निर्यातीसाठी न्हावाशेवा बंदरात आणली जातात. तेथे मालवाहक जहाजांवर केळीचे कंटेनर लोड करण्यात येतात. 15 ते 18 दिवसांच्या प्रवासकाळात दीर्घकाळ टिकण्याची क्षमता सोलापूरच्या केळीमध्ये आहे. प्रवासादरम्यान सोलापुरी केळीच्या चव, रंगात काहीही फरक पडत नाही, हे विशेष. सध्या सुरू असलेल्या हंगामात सोलापूर जिल्ह्यातून तब्बल 40 हजार कंटेनर केळी निर्यात होत आहेत. एका कंटेनरमध्ये सरासरी 20 टन केळी असतात.
केळी उत्पादक, निर्यातदारांच्या मागण्या
* केळी निर्यातीसाठी सध्या प्रति कंटनेर 25 हजार अनुदान केंद्र व राज्य सरकार देते. त्यामध्ये वाढ करण्यात यावी.
* गुजरात सरकारने केळी निर्यातीसाठी पॅकहाऊस निर्माण केले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारनेही करावेत.
* करमाळा तालुक्यात राहुरी कृषी विद्यापीठाची 50 एकर आणि कृषी विभागाची 50 एकर अशी शंभर एकर जागा आहे. तेथे केळी संशोधन व रिसर्च सेंटर उभारण्याचे प्रयत्न व्हावेत.
* केळी पीक संशोधन केंद्रासह केळी पीक पूरक उद्योगाचे केंद्र करमाळा तालुक्यात निर्माण करण्यात यावे.
सोलापूरच्याच केळींना मागणी का?
वारंवार एकच पीक, त्यातही केळीचे पीक घेतल्याने जळगाव भागातील जमिनीचा पोत खालावला आहे. त्या तुलनेत सोलापुरातील जमिनीचा पोत दर्जेदार आहे. सोलापूर परिसरातील वातावरण केळीच्या पिकास अतिशय पोषक आहे. त्यामुळे येथील केळीची लांबी, चव, त्यातील पौष्टिक घटक द्रव्ये आणि दीर्घकाळ फळ टिकण्यासाठी आवरण असणारी जाड साल. यामुळे सोलापूरच्या केळींना अरब राष्ट्रांमध्ये जास्त मागणी असून दरही जास्त मिळत आहे.