

सोलापूर : मिरवणुकीमध्ये डॉल्बी आणि लेझर लाईट शो करण्यास बंदी घालण्यात आली असून, याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी कार्तिकेएयन एस. यांनी 9 एप्रिल रोजी काढले आहेत. मिरवणुकीच्या उत्सवामध्ये मोठ्या आवाजाच्या डीजे, डॉल्बी लावण्यात येत असल्याने त्याचा नागरिकांच्या मानसिक व शारीरिकतेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा समोर आला होता.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 14 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पारंपरिक पध्दतीने व मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे. सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. या मिरवणुकीमध्ये मंडळांकडून डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे.
मिरवणूक पाहण्यासाठी सहभागी झालेल्या नागरिकांना डॉल्बी सिस्टीममुळे कानाचा व छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली आहे. लेझर लाईट डोळ्यावर पडल्यामुळे मुख्यत्वे वयोवृध्द व लहान मुलांच्या डोळ्याच्या पडद्याला तसेच बुबळाला इजा झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत ज्येष्ठ नागरिक संघटनांनी त्यांना व इतर नागरिकांना डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा जीवितास धोका तसेच इतर शारीरिक दुष्परिणाम होत असल्याचे निवेदनही सादर केल्याने त्याबाबतचा अहवालही उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्र. 1 यांनी दि.25 मार्च2026 रोजीच्या पत्रान्वये सादर केला आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दि. 13 ते दि. 20 एप्रिल या कालावधीत सोलापूर जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक उत्सव मंडळांकडून आयोजित कार्यक्रम, मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट शोचा वापर करण्यास बंदी असल्याचे आदेश काढून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिला आहे.