

सुमीत वाघमोडे
सोलापूर : राज्यातील काही शहरांत सत्ताधारी पक्षाने विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ येथून फ्लाय ९१ व स्टार एअर कंपनीच्या विमानसेवा सुरू होणार आहे. विमाने कमी असल्याने सर्वच ठिकाणी विमानसेवा देता येणे शक्य नाही. त्यामुळे सोलापूरची विमानसेवा काही महिन्यांसाठी बंद ठेवून इतर ठिकाणाहून विमानसेवा सुरू करण्यासाठी कंपन्यांवर दबाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते. तरीही किरकोळ अडचणी वगळता विमानसेवेत अडथळा आला नाही. परंतु यंदा पावसामुळे दृश्यमानता कमी असल्याचे कारण देत दोन्ही विमानसेवा बंद करण्याचा कंपन्यांचा निर्णय संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याविषयी ‘पुढारी’ने शोध मोहीम हाती घेतली असता वरील कारण पुढे आले. राज्यातील शहरांमध्ये काहीकाळ विमान सेवा सुरू करायची पुन्हा तेथून बंद करून अन्य ठिकाणी सेवा द्यायची अन् क्रेडीट घ्यायचे हे शासनाचे धोरण असल्याचे ‘पुढारी’च्या शोध मोहिमेत स्पष्ट झाले.
१८ जूनपासून सोलापूर-गोवा विमानसेवा बंद झाली तर आजपासून म्हणजे ३० जून पासून सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद झाली. १६ सप्टेंबर पासून सोलापूर- मुंबई विमानसेवा सुरु होणार असून त्याचे बुकिंग घेतले जात आहे. दोन्ही विमानसेवांना ८५ टक्के प्रतिसाद आहे. स्टार एअरच्या विमानांना रिकाम्या जागांसाठी सरकार अनुदानही देते. त्यामुळे एवढा प्रतिसाद असताना देखील दृश्यमानता कमी हे कारण पटण्याजोगे नसल्याने सोलापूरकरांत याविषयी उलटसुलट चर्चा आहे.