

सोलापूर : एटीम कार्ड मशिनमध्ये अडकल्यानंतर त्याचा फायदा घेत कार्ड चोरुन खात्यातील ५० हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना पांजरापोळ चौकात घडली.
याप्रकरणी संतोष बाळासाहेब पाटील (वय ४९, रा. भारतमाता नगर) यांनी फिर्याद दिली आहे. दोन ऑगस्ट रोजी दुपारी संतोष हे त्यांच्या पत्नीच्या नावे असलेले एटीएम कार्ड वापरुन पांजरापोळ चौकातील एटीएम सेंटरमधून पैसे काढत होते. यावेळी कार्ड एटीएम मशिनमध्ये अडकले. त्यावेळी एक इसम मदत करण्याच्या बहाण्याने तिथे आला.
एका गार्डला बोला म्हणून त्याने संतोष यांना फोन लावून दिला. त्या गार्डने १५ मिनिटात माणूस पाठवतो तेथेच थांबा असे सांगितले. त्यानंतर त्या अज्ञात इसमाने गार्ड येण्यास उशीर लागेल आता तुम्ही दुसरे कार्ड काढून घ्या, म्हणून त्यांना पाठवून दिले. त्यानंतर त्या कार्डचा वापर करुन तब्बल ५० हजार रुपये अकाउंटमधून काढून घेतले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.