

Maharashtra Education Department
मोहोळ : राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित व खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. माजी विद्यार्थ्यांना शाळांच्या प्रगतीत सहभाग घेण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या संघामध्ये अध्यक्ष,उपाध्यक्ष,कोषाध्यक्ष, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य सचिव म्हणून असतील. याशिवाय एक पालक प्रतिनिधी, सेवानिवृत्त अधिकारी व शिक्षक यांचा सल्लागार सदस्य म्हणून समावेश असेल. प्रत्येक शाळेला वर्षातून किमान एकदा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि स्नेहसंमेलन आयोजित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस अशा सणांच्या काळात हे कार्यक्रम होतील. त्यात माजी विद्यार्थ्यांचे सत्कार, शाळेचा विकास आराखडा, शिक्षकांचे सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
राज्य सरकारने यासाठी एक ऑनलाइन नोंदणी प्रणाली तयार केली असून त्यावर प्रत्येक माजी विद्यार्थ्याची नोंदणी केली जाईल. शाळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे फोटो व अहवाल देखील ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक असेल. यामुळे शाळांना माजी विद्यार्थ्यांचा शाळांच्या व शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपयोग करून घेता येईल व यातून सामाजिक विकास साधेल.
शाळेच्या भौतिक सुविधा उभारणीसाठी मार्गदर्शन व सहकार्य, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, शिष्यवृत्ती व प्रेरणा देणे, शाळेशी भावनिक नाते दृढ करून सामाजिक बांधीलकी जपणे, पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रम राबविणे.
शाळांच्या भौतिक सुविधा असतील किंवा विविध प्रकारचे विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्य देणे, संगणक संच देण्यामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा आहे. हे ओळखून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळेत 'माजी विद्यार्थी संघ' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे -
- अविचल महाडिक, गटशिक्षणाधिकारी, मोहोळ