

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा वरुणराजा मे महिन्यांपासून कृपाद़ृष्टी दाखवित आहे. जिल्ह्यातील लघू पाटबंधारे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच शंभर टक्के भरल्याने त्याचा फायदा पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
बोरी मध्यम प्रकल्पामुळे अक्कलकोट तालुक्यातील दक्षिणकडील भागात शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. या प्रकल्प पाणलोट क्षेत्रावर झालेले पाऊस आणि तुळजापूर तालुक्यातील पावसाने बोरा मध्यम प्रकल्प भरल्याने बोरी नदी शंभर टक्के भरून वाहत आहेत. बी. बी. दारफळ येथील लघू पाटबंधार्याचे पाणी साठवणूक क्षमता ही 2.89 द.ल.घ.मी इतकी असून 6 ऑगस्ट रोजीच शंभर टक्के भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्यासह परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी लघू पाटबंधारे तलावही शंभर टक्के भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे. या तलवाची पाणी साठवणूक क्षमता ही 5.28 द.ल.घ.मी इतकी आहे. बार्शी तालुक्यातील लघु प्रकल्प कोरेगावही 1.96 द.ल.घ.मी इतक्या क्षमतेने भरला आहे. कोरा प्रकल्प 1.70 द.ल.घ.मी क्षमतेने भरला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धुबधुबी शंभर भरला आहे.
सीना, भोगावती दुथडी भरून वाहू लागली
बार्शी तालुक्यातील मध्यम प्रकल्प हिंगणी (पा) येथील पाटबंधारे विभागाचे एकूण प्रकल्पीय पाणी साठा 45.51 द.ल. घ.मी. इतकी असून शंभर टक्के भरले आहेत. हिंगणी (पा) सांडव्यावरून भोगावती नदीमध्ये अनियंत्रित विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असून, वैराग-हिंगणी वरील पूल पाणी खाली गेला आहे. त्यामुळे सीना नदीही दुथडी भरून वाहत आहे.