

अकलूज : सुमारे 25 लाख 68 हजार 340 रुपये किमतीचा 129 किलो गांजा अकलूज पोलिसांनी मंगळवारी (दि. 10) मध्यरात्री धाड टाकून पकडला. यावेळी दोन आरोपींना अटक करून माळशिरस न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 जूनपर्यंत पोलिस कोठडी दिल्याची माहिती अकलूज पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी पत्रकारांना दिली.
याबाबत पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाळुंग (ता. माळशिरस) येथे मोठ्या प्रमाणात गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी साठा करून ठेवल्याची माहिती अकलूज पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी आपल्या सहकार्यांसह राजू महादेव काळुंखे (रा. डांगेवस्ती, उजनी कालव्याजवळ, महाळुंग, ता. माळशिरस) याच्या घरात प्रवेश करून शोध घेतला. तेथे आठ गोण्यामध्ये सुमारे 129 किलो 426 ग्रॅम वजन असलेला गांजा मिळाला. याची किमत सुमारे 25 लाख 68 हजार 340 रुपये इतकी आहे.
यावेळी आरोपी राजू महादेव काळुंखे व आनंद भगवान भिसे (रा. अकलूज) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुंगीकारक औषधे द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे हे करीत आहेत.