

सोलापूर : फ्लाय 91 या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून सोलापूर विमानतळ येथून दि.26 मे. रोजी पासून सोलापूर ते गोवा प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
गेल्या काही महिन्यापासून प्रतिक्षेत असलेल्या सोलापूरकरांसाठी ही सुखद बातमी असून लवकरच विमान तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूरच्या विमानसेवा संदर्भात आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाला होता.
होटगी रोडवरील विमानतळावरून विमान उडानसाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची वीज निर्मिती चिमणी आडवी येत असल्याच्या कारणावरून डीजिसीआयने परवानगी दिली नव्हती. नऊ वर्षाच्या कोर्टकचेरीनंतर अखेर दीड वर्षांपूर्वी कारखान्याची चिमणी जमीन दोस्त करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या आधी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुमारे 60 कोटी रुपये खर्च करून होटगी रोडवरील विमान सेवेसाठी विमानतळ नूतनीकरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले.
त्यानंतर ही विमानसेवा कंपनीने सोलापूर गोव्यासाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली. डिसेंबर 2024 महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल अशी फ्लाय 91 या कंपन्या जाहीर केले. परंतु तेव्हा वातावरणात मोठ्या प्रमाणात धुके तयार झाल्याने ती विमानसेवा जानेवारी 2025 च्या अखेरी सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. त्यानंतर 42 सीटर विमान सेवा ही परवडत नसल्याने 72 सीटर विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात परवानगी मागितली. त्याला परवानगी मिळाली. परंतु विमान सेवेसाठी लागणाऱ्या इंधनाची सुविधा होटगी रोडवरील विमानतळावर नसल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर नुकतेच इंधनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता 26 मे पासून होटगी रोडवरील विमानतळावरून गोव्यासाठी विमान उडणार आहे.
फ्लाय 91 या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून सोलापूर विमानतळ येथून दिनांक 26 मे रोजी पासून सोलापूर ते गोवा प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे.
- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी