

सोलापूर : सध्या दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर कार्यक्षेत्र असलेल्या सोलापूर शहरातील सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता त्यात आणखी एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. दक्षिण सोलापुरसाठी स्वतंत्र बाजार समिती निर्माण होणार आहे, तसा आदेश राज्य शासनाने गुरुवारी काढला आहे.
मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर नवीन कृषि उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील तरतुदी अंतर्गत सद्यस्थितीत राज्यात एकूण 305 कृषि उत्पन्न बाजार समित्या असुन सदर बाजार समित्यांचे 625 उपबाजार आवार कार्यरत आहेत. मात्र राज्यातील 68 तालुक्यांमध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत नसल्याचे निर्दशनास आले आहे. राज्यात एकूण 358 तालुक्यांपैकी 68 तालुक्यामध्ये बाजार समित्या अस्तित्वात नसल्याने मुख्यमंत्री बाजार समिती योजने अंतर्गत तालुका स्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन योजनेतंर्गत दक्षिण सोलापूर स्वतंत्र बाजार समिती स्थापन होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
दक्षिण सोलापुरसाठी कृषि उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यासाठी किमान 10 ते 15 एकर जागा लागणार असून, मुख्य कृषि उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात नसलेल्या ज्या तालुक्यांमध्ये उपबाजार कार्यरत आहेत अशा उपबाजारांचे मुख्य कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये रुपांतर करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत.