

सोलापूर : नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, तसेच लहान मुलांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्था, दूध संकलन केंद्रे, दूध वाहतुकदार, हॉटेल व रेस्टॉरंट चालक आणि अन्न विक्रेत्यांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार अन्नपदार्थांची गुणवत्ता राखण्याबरोबरच अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन अन्न औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केले आहे.
दूध वाहतुकीसाठी प्लॅस्टिकच्या कॅनचा वारंवार वापर केल्यामुळे प्लॅस्टिकमधील काही घटक दुधात मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच दूध वाहतुकीदरम्यान आवश्यक तापमान राखले गेले नाही, तर दूध खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक संस्था, दूध संकलन केंद्रे आणि दूध वाहतुकदारांनी प्लॅस्टिकच्या कॅनऐवजी स्टेनलेस स्टीलच्या कॅनचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, चायनीज सेंटर, बिर्याणी विक्रेते तसेच इतर तयार अन्नपदार्थ विक्रेत्यांनी ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून तयार अन्नपदार्थांमध्ये अनावश्यक खाद्यरंगांचा वापर करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शाळा परिसरात जंक फूडवर निर्बंध
लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात साखर, मीठ आणि तेलाचे प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांच्या उत्पादन व विक्रीवर मनाई करण्यात आली आहे.