

सोलापूर : शहरातील बोगस डॉक्टर आणि बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावणाऱ्या दवाखान्यांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चौघांना पाच लाख रुपयांचा दंड करण्यात आलेला असून दवाखानेही सील करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली.
महापालिकेने शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला असून दाजी पेठेतील डॉ. बी. एस. द्यावनपल्ली यांचा दवाखाना आवश्यक वैद्यकीय पदवी नसल्याने सील करण्यात आला. तसेच किडवाई चौकातील संजीवनी निसर्गोपचार केंद्रातील डॉ. शुबन शेख यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आल्याची आली. साई समर्थ पॉलीक्लिनिक अँड डेंटल केअर येथेही तपासणीदरम्यान अनियमितता आढळली.
दवाखाना एका डॉक्टराच्या नावे तर प्रत्यक्षात दुसऱ्या डॉक्टरच्या माध्यमातून उपचार केले जात असल्याची बाब समोर आली. या डॉक्टरांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली.
दरम्यान, बायोमेडिकल वेस्टची नियमबाह्य विल्हेवाट लावल्याप्रकरणी काही दवाखान्यांना दंड करण्यात आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील बाजूस सिद्धार्थ चौक परिसरात बेगमपूर लॅब आणि पंढरपूर मेडिकलच्या चिठ्ठ्या आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.