

सोलापूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला सोलापूर येथील विशेष न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. नागेश राजू तलाठी (वय २८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष न्यायाधीश भस्मे यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली होती. फिर्यादी महिलेच्या घरासमोर भाड्याने राहणाऱ्या नागेश तलाठी याने पाणी भरण्याचा पाईप मागण्याच्या बहाण्याने तिच्या नऊ वर्षे सात महिन्यांच्या मुलीला स्वतःच्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड दाबून धरले. मात्र, त्याचवेळी आरोपीचा मुलगा तेथे आल्याने मुलीची सुटका झाली. घाबरलेल्या मुलीने घरी पळून जाऊन आईला घडलेला प्रकार सांगितला.
या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश भोईटे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. डोके यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यानुसार न्यायाधीश भस्मे यांनी आरोपी नागेश तलाठी याला २० वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच इतर कलमांन्वये वेगवेगळी शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून पोलिस शिपाई विक्रांत कोकणे यांनी काम पाहिले. दोषसिद्धी कक्षातील सहायक पोलिस निरीक्षक डाकेवाड आणि त्यांच्या संपूर्ण पथकानेही या कामात सहभाग घेतला.