

सोलापूर : अवजड वाहतुकीमुळे शहरात आणखी एकाचा बळी गेला आहे. शहरातील 70 फूट रोडवर डंपरच्या धडकेत सायकलस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी (दि. 17) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. महंमद हनीफ अ. रजाक सव्वालाखे (वय 54, रा. आदर्शनगर, जुना कुंभारी नाका, सोलापूर) असे मयत झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे.
महंमद सव्वालाखे हे शनिवारी दुपारी घरातून सायकलवरून बाहेर पडले. माधवनगर येथील बालाजी हार्डवेअर दुकानासमोर त्यांच्या सायकलला पाठीमागून येणाऱ्या डंपरने (एमएच 13 ईई 6662) धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सदर बझार पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार जे.एन. लांबतुरे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वी ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरीकांनी गर्दी केली होती. यावेळी नागरीकांना डंपरला जाण्यास मज्जाव केला. पोलिसांनी मध्यस्थीने डंपर सदर बझार पोलिस स्टेशनला आणला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयात मयताच्या नातेंवाईकांनी गर्दी केली होती. गेल्या काही वर्षात अवजड वाहतुकीमुळे पुन्हा बळी जाण्याचे प्रकार वाढले आहेत.