

सांगोला : रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर कार चालकाने दोन मोटारसायकलला धडक देऊन कंटेनरलाही धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तेजस नागनाथ चांदेकर (वय 26), रा. जुना कराड नाका ता. पंढरपूर) हा ठार झाला तर दोघे जखमी झाले आहेत. या चार वाहनांचे मिळून पाच लाखांचे नुकसान झाले आहे. कार चालक कोमु व्यंकटेश प्रभाकर रा. तेलंगणा याच्या विरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार, दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर हायवेवर सांगोला ते सांगली जाणाऱ्या रोडवर डॉ. गणपतराव देशमुख सूत गिरणी सांगोला समोर मुरलीधर गणपत सासणे (वय 23) रा. अनिल नगर, पंढरपूर हे मोटारसायकलवर मित्र विशाल व तेजस असे स्कुटीवर जात असताना पाठीमागून भरधाव वेगात रोडची परिस्थिती न पाहता कार नंबर (टी.एस. 06 ए. ई. 52 11) चा चालक कोमु प्रभाकर रा. तेलंगणा याने त्याच्या ताब्यातील कार चालवुन प्रथम मोटारसायकलला (एम.एच. 45 बी. 563) ला धडक देऊन खाली पाडुन चालकाला जखमी केले.
तसेच विशाल चालवित असलेल्या स्कुटी (एम.एच. 13 ई.व्ही. 9629) ला धडक देऊन त्यांना खाली पाडुन विशाल यास गंभीर जखमी करून तेजस यास गंभीर जखमी केले. त्यात तेजस चांदेकर याचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले असून दोन्ही मोटारसायकलचे तसेच त्याच्या कारचे व ट्रक नंबर (टी.एल. 13 ई.व्ही. 9629) यास पाठीमागील उजव्या बाजुस धडक दिली. या सर्व वाहनांचे 5 लाख रूपयांचे नुकसान केले आहे.