

टेंभुर्णी : -ओव्हरटेक करणाऱ्या बसने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली.हा अपघात टेंभुर्णी-बार्शी रोडवर टेंभुर्णी जवळील तांबवे गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी २.४५ वा.सुमारास झाला.अपघात एवढा भीषण होता की,या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
या अपघातात उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीद (वय-५७) सुनिता उपकार उर्फ बाळासाहेब काशीद (वय-५० वर्षे) दोघे रा.बुवासहेब नगर कोळकी (ता. फलटण,जि.सातारा व शारदा संभाजी राऊत (वय-६५ वर्षे),तावशी ता.इंदापूर जि.पुणे अशी मयतांची नावे आहेत.तर मुक्ताबाई कल्याण राऊत (वय-७०) रा.तावशी,ता.इंदापूर,जि पूणे असे जखमी महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,उपकार उर्फ बाळासाहेब काशीद हे त्यांची पत्नी सासु शारदा राऊत व चुलत सासु मुक्ताबाई राऊत असे चौघे मिळून त्यांचेकडील काशीद यांच्या कार मध्ये (एमएच ११ सी.जी ९०६६) मधून माढा येथे लग्नाला गेले होते.त्यानंतर दुपारी ते लग्न उरकून टेंभुर्णीकडे येत असताना उपकार उर्फ बाळासाहेब काशीद यांच्या कारला समोरून आलेल्या रोहा-पुणे-लातूर बसने (क्र-एम.एच-१४-एम.एच-०१९८) समोरील अज्ञात वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अचानक बसचे तोंड बाहेर काढून समोरून आलेल्या व फलटणकडे निघालेल्या कारला जोरदार धडक दिली.
हा अपघात २.४५ वा. सुमारास झाला.या भीषण अपघातात उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीद (वय-५७) सुनिता उपकार उर्फ बाळासाहेब काशीद (वय-५० वर्षे) दोघे रा.बुवासहेब नगर कोळकी (ता. फलटण,जि.सातारा व शारदा संभाजी राऊत (वय-६५ वर्षे) चारजण गंभीर जखमी झाले त्यांना टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तीन जणांना मयत घोषित केले.या अपघातात कारचे दीड लाखाचे तर बसचे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.या अपघातात कारचा संपूर्ण चक्काचूर झाला.
अपघाताची फिर्याद अनिल जगन्नाथ यादव (वय-५०) रा.निमगाव केतकी ता.इंदापूर, जि. पूणे यांनी दिली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून बसचालक जोतिराम भीमराम जाधव रा.गितानगर,पणदरे पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.