

माळशिरस : माळशिरस पंचायत समितीतील वरिष्ठ सहायक सुंदरराव नागटिळक (वय 56) याला सोमवारी पाच हजारांची लाच घेताना पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी धर्मपुरी येथे सभामंडपाचे काम केले आहे. या कामाचे सोलापूर कार्यालयाकडे दाखल केलेले बिल माळशिरस पंचायत समिती कार्यालयाकडे आले. त्यानंतर काम झाल्याचा दाखला गटविकास अधिकारी यांच्याकडून मिळवून देण्यासाठी वरिष्ठ सहायक सुंदरराव नागटिळक यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. याबाबत त्यांनी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सोमवारी पंचायत समिती कार्यालयात दुपारी दोनच्या सुमारास तडजोडीअंती दाखला देण्यासाठी पाच हजाराची रक्कम स्वीकारताना नागटिळक यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणात गटविकास अधिकारी यांची पडताळणी केली असता त्या पडताळणीत काहीही आढळून आले नाही. आरोपी नागटिळक विरोधात सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सदरचा गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे
सदरची कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे लेडीज पोलीस कॉन्स्टेबल माकर पोलीस कॉन्स्टेबल तावरे कुमकर व चालक दिवेकर यांनी केली.