

सोलापूर : समाजातील गरजू, गरीब आणि निराधार घटकांच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या आस्था सामाजिक संस्थेने पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले आहे. वडिलांचे छत्र हरपलेल्या एका गरीब मुलीच्या विवाहासाठी संस्थेच्या वतीने संसारोपयोगी साहित्य देऊन तिच्या नव्या संसाराला मायेचा आधार देण्यात आला.
वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोटचे चेअरमन महेश इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. जुना विडी घरकूल, तुळशांती नगर, सोलापूर येथे राहणाऱ्या श्रीमती वनिता चौडप्पा काळूर यांचे पती चौडप्पा काळूर यांचे वर्षभरापूर्वी अकाली निधन झाले. त्यांना एक मुलगी आणि एक लहान मुलगा असून पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी वनिताताईंवर आली आहे.
अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असणारे संसारोपयोगी साहित्य खरेदी करणे कुटुंबाला शक्य नव्हते. ही परिस्थिती लक्षात घेऊन वनिता यांनी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करीत मुलीच्या विवाहासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक विनायक विटकर, अध्यक्ष आनंद तालिकोटी, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे , योगेश कुंदुर, वेदांत तालिकोटी, महेश नळे, शशांक हंडगे, पिंटू कस्तुरे उपस्थित होते.