

उत्तर सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले होते. त्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी या परीक्षेच्या बाळे येथील केंद्राला भेट देऊन परीक्षेचे कामकाज पाहिले. जिल्ह्यातील जवळपास आठ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.
इयत्ता तिसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील 40 केंद्रावर प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत परीक्षा झाली. परीक्षा सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी बाळे येथील राजीव प्राथमिक शाळा येथील केंद्राला भेट देऊन परीक्षेचा आढावा घेतला. यावेळी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख, उत्तर सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, विस्तार अधिकारी सुदर्शन राठोड, केंद्रप्रमुख जीवराज खोबरे, मुख्याध्यापक मोहन घोडके, विश्वकृपा विद्या प्रतिष्ठानचे अमोल ढेपे आदी उपस्थित होते.