

सोलापूर : एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत जिल्ह्यातील 61 सेविका, 115 मदतनीसांची रिक्त पदे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी भरती प्रक्रियेला महिला व बालकल्याण विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील रिक्त अंगणवाडी पदे भरण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २० जुलैपासून सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने यासाठी तयारी सुरु असून, ६१ अंगणवाडी सेविका आणि ११५ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १७६ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांमुळे बालक, गर्भवती व स्तनदा माता तसेच लाभार्थींना सेवा देण्यात अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.