

सोलापूर : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेतलेली नीट-पीजी परीक्षा रविवारी जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रांवर झाली. यावेळी ४७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा केंद्रांवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मोबाईल, स्मार्टवॉच, टॅबलेट, कॅल्क्युलेटर आदी इलेक्ट्रॉनिक साधनांनाही प्रवेशबंदी होती.
सोलापूर शहरातील केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे १३० विद्यार्थ्यांनी, सोलापूर डिजिटल हब येथे १८१ विद्यार्थ्यांनी, तर एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे ८५ विद्यार्थ्यांनी, तर अकलूज येथील शंकरराव मोहिते-पाटील रिसर्च सेंटरमध्ये ७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पोलिसांनी निर्बंध लागू केले होते. या परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, घोषणाबाजी करण्यास तसेच झेरॉक्स, टायपिंग, इंटरनेट कॅफे सुरू ठेवण्यास मनाई होती.
परीक्षा केंद्रांभोवती १०० मीटर निर्बंध
सोलापूर शहरातील परीक्षा केंद्राभोवती १०० मीटर परिसरात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निर्बंध लागू होते. या संदर्भातील आदेश पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी काढले होते.