

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सव्वा दोन महिन्यांत ३४ जणांनी जीवन संपवले, तर तब्बल ८२ जणांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. हे करणाऱ्यांमध्ये युवक आणि पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रेमभंग, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक वाद, वैवाहिक समस्या, अनैतिक संबंध यांसह विविध कारणांमुळे व्यक्ती टोकाचा निर्णय घेत असल्याचे भीषण, भयंकर वास्तव समोर आले आहे.
दि. १ जुलै ते ९ सप्टेंबर या सव्वा दोन महिन्यात ३४ जणांनी आत्महत्या केली तर ८२ जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. म्हणजेच सरासरी दररोज एकापेक्षा अधिक व्यक्तींनी जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. आत्महत्या वेगवेगळ्या वयोगटांतील व्यक्ती या घटनांमध्ये दिसून येतात.
अशा उपाययोजनांची प्राधान्याने गरज
- घटना घडल्यानंतर कारणांचा शोध घेण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज
- कुटुंबातील व्यक्तीच्या वर्तनात अचानक बदल जाणवत असेल, ती व्यक्ती सतत निराश किंवा एकटी राहत असेल, स्वतःबद्दल नकारात्मक बोलत असेल किंवा जीवन संपविण्याचे संकेत देत असेल तर ते गांभीर्याने घेणे गरजेचे
- गरज भासल्यास डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्यावी. कुटुंबामध्येही समस्या बोलून दाखविणे म्हणजे कमजोरी हा गैरसमज दूर करण्याची गरज
- मनातली घुसमट व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळाले तर अनेक संकटे टाळता येते, हा विचार रुजविण्याची गरज