Solapur News: पुढील महिन्यात येणार २५ ई सिटी बस

मुंबईतील बैठकीत निर्णय; पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण केंद्राच्‍या कामांना मिळणार गती
Solapur News: पुढील महिन्यात येणार २५ ई सिटी बस
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील पाणीपुरवठा, बससेवा व जलशुध्दीकरण प्रकल्पाच्‍या कामांना गती मिळावी यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे व आ. देवेंद्र कोठे यांनी बुधवारी (दि. १) मुंबईत विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. १५ ऑगस्‍टपूर्वी सोलापुरात २५ ई सिटी बसेस दाखल होतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आ. देवेंद्र कोठे यांनी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्या समवेत बैठक घेतली. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एक हजार ४०० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना जागतिक बँकेकडे अंतिम मंजुरीसाठी आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याने त्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. यातील त्रुटींची पूर्तता करून १५ जुलैपूर्वी महाराष्ट्र शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन डॉ. गोविंदराज यांनी दिले.

केंद्र शासनाकडून १०० ई बस मंजूर करण्यात आल्या आहेत. या बस लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आ. देवेंद्र कोठे यांनी अनेकदा सभागृहात केली आहे. कंपनीशी करार पूर्ण झाला असून वाहनतळाचे काम देखील पूर्ण झाले आहे. मात्र तरीदेखील सोलापूर शहराला बस मिळण्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे त्‍यांनी निदर्शनास आणून दिले. डॉ. गोविंदराज यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. १५ ऑगस्ट पूर्वी शहराला किमान २५ बस देण्यात येतील, असे आश्वासन त्‍यांनी दिले.

पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या फाईलमधील त्रुटी वर्षभरापासून पूर्ण करून ती फाईल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी याकरिता प्रयत्‍न करण्याची मागणी डॉ. गोविंदराज यांच्‍याकडे केली. सोलापूर शहर विकासाचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन डॉ. गोविंदराज यांनी याप्रसंगी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news