

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 1688 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. 242 उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा होणार आहे. सध्या 45 उपकेंद्रांच्या ठिकाणी उपलब्ध 50 जागावंर 279 मेगावॅट सौर प्रकल्पांचे कामे सुरू आहेत. या कामांना लोकसंवाद, सहकार्यातून गती द्यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले.
सोलापूर येथील नियोजन भवनात मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक झाली. यावेळी लोकेश चंद्र बोलत होते. यावेळी प्रकल्प संचालक सचिन तालेवार, प्रकल्प कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, धनंजय औंढेकर, श्रीकांत जलतारे, सुनील काकडे, मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, निवासी जिल्हाधिकारी गणेश निर्हाळी, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, पोलिस निरीक्षक डी. बी. भित्तडे, महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक प्रसन्न चित्रे, सहाय्यक विद्युत निरीक्षक व. नि. सुतार उपस्थित होते.
मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे पुढील एक वर्षात 16 हजार मेगावॅट विजेचा शेतीला दिवसा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचा अभ्यास व अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राज्यस्थान या राज्यांतील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी येत आहेत.
अकोलेकाटी उपकेंद्रातील नव्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमुळे उपकेंद्राची क्षमता 15 एमव्हीए झाली आहे. यापूर्वी सन 1995 व 1999 मध्ये प्रत्येकी 5 एमव्हीएचे पॉवर ट्रान्सफॉर्मर या उपकेंद्रात बसविण्यात आले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेतून आणखी 5 एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाले आहे. यासह 53 लाख रुपये खर्चाच्या सक्षमीकरणाची इतर तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. सद्यस्थितीत 53 पैकी 44 उपकेंद्रात नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर तर 29 पैकी 28 उपकेंद्रांमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या क्षमता वाढीचे काम पूर्ण झाले आहे.
मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेतील अकोलेकाटी (उत्तर सोलापूर) 33/11 केव्ही उपकेंद्रातील 5 एमव्हीए क्षमतेचे नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर सुरू झाले असून, गुळवंची येथे 7 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प पूर्णत्वाकडे असून या उपकेंद्रातील 6 वीजवाहिन्यांद्वारे अकोलेेकाटी, गुळवंची, कारंबा गाव व परिसरातील 2270 शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.