

सोलापूर : अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराचे स्वप्न उराशी बाळगलेल्या सोलापूर जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील 1348 कुटुंबांसाठी उद्याची सकाळ एक नवी पहाट घेऊन येणार आहे. भाड्याच्या घरात राहताना होणारी ओढाताण आणि अस्थिरतेचे दिवस आता संपणार असून, त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साकारलेल्या या भव्य गृहप्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्याने या कुटुंबांच्या आयुष्यात स्थिरतेचा आणि आनंदाचा सूर्योदय होणार आहे.
हा भव्य लोकार्पण सोहळा उद्या, रविवार, दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे येथील ’राष्ट्रतेज अटल गृहप्रकल्प’ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यांच्या साक्षीने हजारो नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
लाभार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा
या प्रकल्पातील घरकुले केवळ निवारा नसून, लाभार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करणारी एक मोठी योजना आहे. लाभार्थ्यांना केवळ 1000 रुपये इतके नाममात्र मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे, ज्यामुळे हजारो रुपयांची बचत होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या घरासाठीच्या कर्जाचा मासिक हप्ता सध्याच्या घरभाड्याइतकाच असणार आहे. यामुळे स्वतःच्या घराचे मालक होताना कुटुंबावर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही. असंघटित क्षेत्रातील 811 बांधकाम मजुरांना कामगार विभागाकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळाले आहे, ज्यामुळे घराची किंमत आणखी कमी झाली आहे.
हे गृहप्रकल्प केवळ चार भिंतींच्या इमारती नसून, एक परिपूर्ण आणि आधुनिक जीवनशैली देणारी वसाहत आहे. या ठिकाणी सामुदायिक सभागृह, मुलांसाठी अंगणवाडी, सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे, प्रशस्त खेळाचे मैदान, व्यायामाच्या उपकरणांसह बाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासनाच्या दूरदृष्टीमुळे हरित पट्ट्यातील जमीन स्वस्त दरात मिळाल्याने प्रत्येक लाभार्थ्याची सुमारे 1 लाख रुपयांची बचत झाली आहे. म्हाडाने नगरोत्थान योजनेअंतर्गत गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा या दोन्ही जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
अनेक अडचणींवर मात करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाचे नियोजन केले. त्यामुळेच आज हजारो कुटुंबांसाठी हा आनंदाचा दिवस उजाडला आहे. हे प्रकल्प म्हणजे केवळ शासकीय योजनेची पूर्तता नसून, सामान्य माणसाच्या आयुष्यात स्थैर्य आणि सन्मान आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
दहिटणे गृहप्रकल्प: ’राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थे’मार्फत दहिटणे येथे 50 इमारतींमध्ये 327 चौरस फुटांच्या 1200 सदनिका उभारण्यात येत आहेत. यापैकी तब्बल 1128 सदनिकांचे काम पूर्ण झाले असून, त्या वितरणासाठी सज्ज आहेत.
शेळगी गृहप्रकल्प: सोलापूर महानगरपालिका हद्दीतील शेळगी येथे ’श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहप्रकल्पा’अंतर्गत 8 इमारतींमध्ये 252 सदनिकांचे नियोजन आहे. यापैकी 220 सदनिकांचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
महत्वाचे मुद्दे...
मुद्रांक शुल्क फक्त 1000 रुपये
811 बांधकाम मजुरांना प्रत्येकी 2 लाखांचे अनुदान.
सौरदिवे, बाग, आरोग्य केंद्र, सभागृह अशा सुविधा
हरित पट्ट्यातील जागेमुळे प्रत्येक सदनिकेमागे 1 लाख बचत.
दहिटणे येथील 1128, शेळगी येथील220 घरकुलांचे काम पूर्ण