

सोलापूर : जिल्हा परिषदेकडे दीर्घकाळ शिक्षण सेवा बजावलेल्या सहा जणांना सेवाज्येष्ठतेद्वारे शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून पदोन्नती दिले आहे. त्यामुळे सहा गुरुजी विस्ताराधिकारी झाले आहेत. सीईओ कुलदीपक जंगम यांनी ही प्रक्रिया राबवली आहे.
शिक्षकांच्या सेवा काळात शिक्षण विस्ताराधिकारी ही सर्वोच्च बढती मानली जाते. शैक्षणिक सेवा काळातील अंतिम टप्प्यावर शिक्षण विस्ताराधिकारी हे मानाचे व अधिकाराचे पद पदोन्नतीद्वारे जिल्ह्यातील सहा शिक्षकांना मिळाले आहे. त्यामुळे शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे आभार मानले. शासन निर्णयानुसार शिक्षण विस्ताराधिकारी 50 टक्के पदे सरळसेवा भरतीने तर उर्वरित पदे सेवा ज्येष्ठतेद्वारे भरली जातात. जिल्हा परिषदेने दि. 30 जून अखेरपर्यंत रिक्त असलेली सहा पदे पदोन्नतीने भरून शिक्षकांना विस्ताराधिकारी पदाचा मान दिला आहे.
पंढरपूर तालुक्यातील संभाजीराव शिंदे, माळशिरस तालुक्यातील दहिगांव येथील शिक्षिका महादेवी गुंड, करमाळा तालुक्यातील प्रभावती जगताप, दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील सैफन आळगी, माढा येथील कल्लाप्पा अजावडरे आणि बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील भारत बावकर यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा शिक्षकांना विस्ताराधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे. समुपदेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच पदोन्नती आदेश दिल्याने शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे आभार मानले.