

सोलापूर : धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 250 शेतकर्यांची अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथील मातोश्री साखर कारखानाकडे बिले थकली आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेने प्रादेशिक साखर कार्यालयात मंगळवारी (दि.5) ठिय्या आंदोलन केले.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, निलंगासह अनेक तालुक्यातील शेतकर्यांनी मातोश्री साखर कारखान्यास सन 2023-24 मध्ये ऊस घातला होता. त्याचे बिले अद्यापही जमा करण्यात आली नाहीत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकर्यांनी प्रादेशिक साखर कार्यालयाकडे धाव घेतली. प्रादेशिक साखर कार्यालयातील अधिकारी पांडुरंग साठे यांनी मातोश्री कारखान्याचे चेअरमन शिवराज म्हेत्रे यांना बोलावून घेतले. त्यावेळी म्हेत्रे यांनी एक महिन्याच्या आतमध्ये थकीत बिले शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकर्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे, जिल्हा संघटक सुरज बचाटे, जग्गू गायकवाड, जगन्नाथ घोडके, नामू पाटील, चेतन बिराजदार, गणेश स्वामी आदी शेतकरी उपस्थित होते.
आंदोलने करून वैतागले
धाराशिव जिल्ह्यातील शेतकर्यांचे थकीत बिले मिळावीत, यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने काँग्रेस भवन, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या निवासस्थानासमोर अनेकवेळा आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र, त्यानंतरही शेकडो शेतकर्यांचे बिले मातोश्री साखर कारखान्यांनी दिले नाहीत. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत.
दिलेले आश्वासन पाळणार का?
मातोश्री साखर कारखान्याचे चेअरमन शिवराज म्हेत्रे यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकर्यांचे थकीत बिले एका महिन्यात जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, असेच आश्वासन त्यांनी अनेकवेळा दिले होते. परंतु त्या मुदतीत कारखान्यांनी बिले जमा न केल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकर्यांनी अनेकवेळा त्यांच्या घरासमोर आंदोलने केली आहेत. त्यामुळे यावेळी दिलेला शब्द ते पाळणार का, अशी चर्चा शेतकर्यांतून होत आहे.