

वैराग : बार्शी तालुक्यातील मुंगशी (वा.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकूण दोन शिक्षक कार्यरत होते. परंतु एक शिक्षक ३० मे रोजी निवृत्त झाल्याने एकाच शिक्षकावर १ ली ते ४ थी पर्यंतच्या चार वर्गाची जबाबदारी पडली आहे. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
शिक्षक येतो का नाही, या भीतीने पालकांनी बाहेरगावी मुले पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शाळेत फक्त ४५ विद्यार्थी उरले आहेत. शिक्षण विभागाने तत्काळ शिक्षक न दिल्यास युवासेना बार्शी तालुका व पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बार्शी येथे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यास गेल्यावर त्यांनी कारणे देऊन तेथून पळ काढला. शेवटी त्यांच्या खुर्चीवर निवेदन ठेऊन पालकांना निराश होऊन परतावे लागले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले. यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख स्वराज क्षीरसागर, दीपक चुंगे, अभिषेक मडके, ॲड. पांडुरंग घोलप, आनंद उकरंडे, महेंद्र गरड, दीपक तिवाडी आदी उपस्थित होते.