

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सव काळात डीजे, लेझर लाइटवर बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यानंतर आता शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी आदेश काढत सोलापूर शहरात डीजेवर बंदी घातली आहे. सात सप्टेंबरपर्यंत शहरात कोणत्याही मिरवणुकीत डीजे लावता येणार नसल्याचे आदेशात म्हंटले आहे. आदेशाचा भंग करणार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवासह अन्य उत्सव आणि मिरवणुकीत मोठ्याप्रमाणात डीजे, लेझर लाइटचा वापर केला जात होता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होत. त्या पार्श्वभूमीवर दैनिक ‘पुढारी’ने सर्वात प्रथम मार्च महिन्यापासून डीजे विरुद्ध वार्तांकन करत जनजागृतीस सुरुवात केली होती. याविषयी वारंवार वृत्त, विशेष लेख, स्तंभलेखांद्वारे ‘पुढारी’ ने डीजेविरुद्ध तीव्र जनमत करण्यात यश मिळवले. अखेर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यात डीजेवर बंदीचे आदेश काढले त्यानंतर आता पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी आदेश काढत शहरात डीजे बंदी केली. एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान शहरात कोणत्याही मिरवणुकीत डीजे लावता येणार नाही. आदेशाचा भंग करणार्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
पोलीस निरीक्षकांना विशेषाधिकार
सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पोलीस निरीक्षक व त्यावरील वरिष्ठ अधिकार्यांना विशेष अधिकार प्रदान केले आहेत. रस्त्यावरून जाताना नागरिकांनी कशा पद्धतीने वागावे, मिरवणुका कोणत्या मार्गाने काढाव्यात अथवा काढू नयेत, रस्त्यावर अडथळा होणार असेल त्यास मज्जाव करणे, सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था ठेवणे, ढोल, ताशा, गाणी म्हणणे अथवा वाजविणे इतर वाद्ये वाजविणे यावर नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी लाउड स्पिकरवर नियंत्रण ठेवणे यासह इतर विशेषाधिकार देण्यात आले आहेत. सात सप्टेंबर पर्यंत हे अधिकार वापरता येतील.
अनेकांनी भोगली शाररिक इजा
विविध मिरवणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या डीजे आणि लेझर लाइटमुळे अनेकांना कान व हृदयाचा त्रास सहन करावा लागला. काहींना अंशतः तर काहींना कायमचे बहिरेपण मागील काही दिवसात एकाचे हृदयविकाराने निधन झाले. लेझर लाइटमुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाल्या. या सर्वाचे कारण म्हणजे डीजे, लेझर लाइट असल्यामुळे त्यावर बंदी घालण्याची भूमिका ‘पुढारी’ने घेतली. त्यास सजग सोलापूर मंच, ज्येष्ठ नागरिक संघटना, कान-नाक-घसा तज्ज्ञ, विद्यार्थी-विद्यार्थिनींसह सर्व सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डीजे व लेझर लाइटमुळे शारीरिक दुष्परिणाम होत असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी होत होती. या सर्वांची दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यानंतर पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी डीजे बंदीचे आदेश काढले.