Solapur News: बिलासाठी ‘सिद्धनाथ’ पुढे ठिय्या

शेतकरी आक्रमक : पाच ऑक्‍टोबरपर्यंत बिले जमा करण्याचे आश्वासन
Solapur News: बिलासाठी ‘सिद्धनाथ’ पुढे ठिय्या
Published on
Updated on

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्‍यातील तिऱ्हे येथील सिद्धनाथ शुगर कारखान्याने थकीत ऊसबिले तत्काळ जमा करावीत, या मागणीसाठी गुरुवारी (दि.१०) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले. साखर कारखान्‍याच्‍या प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत पाच ऑक्‍टोबरपर्यंत बिले देण्याचे आश्वासन दिले. त्‍यामुळे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

कारखान्‍यांकडील थकीत रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा इशारा स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी आक्रमक होऊन आंदोलन सुरू केले होते. दरम्‍यान, सन ​२०२५-२६ च्या गाळप हंगामाला आठ महिने उलटून गेले आहे. नवीन हंगाम तोंडावर आला आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मागील हंगामाची बिले मिळालेली नाहीत. त्‍यामुळे शेतकरी वैतागले असून, यापेक्षा ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या बेमुदत ठिय्या आंदोलनात जिल्‍हाध्यक्ष विजय रणदिवे, सचिन मस्‍के, मोसीन पटेल, ईस्‍माईल मुजावर, दीपक हजारे, रवी पाटील, अमोल पवार, युवराज भडकुंबे, काकासाहेब पाटील, अजिनाथ पवार, बापू टोणपे आदींसह शेतकरी, सभासद उपस्‍थित होते.

फसवणूक खपवून घेणार नाही

बिले न मिळाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कारखान्याने सुरुवातीला प्रतिटन २८०० रुपये दर देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात केवळ २२३७ रुपयेच टेकवण्यात आले, तर काही शेतकऱ्यांना अजून एक रुपयाही मिळालेला नाही. अशा प्रकारची फसवणूक खपवून घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.

येत्‍या पाच ऑक्‍टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्‍या खात्‍यावर बिले जमा करण्याचे आश्वासन सिद्धनाथ साखर कारखान्‍याचे संचालक धनंजय भोसले यांनी दिले आहे. त्‍यांनी दिलेला शब्‍द न पाळण्यास पुन्‍हा ठिय्या आंदोलन करणार आहे.
- विजय रणदिवे, जिल्‍हाध्यक्ष, स्‍वाभिमानी शेतकरी संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news