सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
मुंबईतील पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मुंबईहून निघालेली सिद्धेश्वर एक्स्प्रेस सोलापूरला सव्वातीन तास, तर इंद्रायणी एक्स्प्रेस पावणेदोन तास उशिरा सोलापूरला पोहोचली. अन्य गाड्याही दीड ते दोन तास उशिरा पोहोचल्या. बुधवारी (दि.25) झालेल्या पावसामुळे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गाड्या संथगतीने पुढे सरकत आहेत. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईहून सोलापूरकडे येणार्या सर्व गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे सोलापूरहून मुंबई, पुणे तसेच दक्षिणेत हैदराबाद, विजयपूर, चेन्नईकडे जाणार्या प्रवाशांची गैरसोय झाली.
मुंबई, पुण्याहून सोलापूरकडे येणार्या आणि सोलापूरहून पुणे, मुंबईकडे जाणार्या सर्वच गाड्या उशिरा धावत आहेत. पुण्यातून सकाळी नऊ वाजता सुटलेली इंद्रायणी एक्स्प्रेस दुपारी दीड वाजता सोलापुरात पोहोचणे अपेक्षित होते, परंतु ही गाडी पावसामुळे उशिरा म्हणजे गुरुवारी दुपारी तीन वाजून 25 मिनिटांनी सोलापुरात पोहोचली. ही गाडी तब्बल पावणे दोन तास लेट झाली. तसेच चेन्नई मेल, उद्यान, विशाखापट्टणम, अजमेर एक्स्प्रेस या गाड्याही उशिरा आल्या. यामुळे प्रवासी स्थानकावर ताटकळले होते तर अन्य प्रवासी रेल्वेगाडीत बसून वैतागले होते.
रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने स्टेशनवर प्रवाशांची गर्दी क्षणोक्षणी वाढत असल्याचे दिसून आले. वेटिंग रूम तर अक्षरशः हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळाले. खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांची गर्दी दिसून आली.