

सोलापूर : सुमारे साडेनऊशे वर्षांची परंपरा असलेली सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिध्देश्वर यात्रा दरवर्षी जानेवारी महिन्यांत मकरसंक्रांतीला भरते. आशिया खंडातील सर्वात मोठी म्हणून सिध्देश्वर गड्डा यात्रेची ओळख आहे. पांढरा शुभ्र बाराबंदी पोशाख, मानाने डौलणारे, योगदंडाचे प्रतिक असलेले नंदीध्वज यांच्या साक्षीने होणारा अक्षता सोहळा हा अध्यात्मिक अनुभूती देणारा असतो. विविध पंथ, समाजातील लोकांना यात्रेत विधींत मान देऊन समाजिक समरसतेची शिकवण देणारी ही यात्रा आहे.
12 व्या शतकात सिध्देश्वर महाराजांनी आपल्या योगसाधनेतून सोलापुरात (पुर्वीचे सोन्नलगी) पंचक्रोशीत 68 शिवलिंगांची स्थापना केली. सोलापूरवर येणाऱ्या संकटापासून वाचविण्यासाठी आठही दिशेला अष्टविनायकाची स्थापना केली. अष्ट काळभैरवाची स्थापना केली. 12 व्या शतकात सिध्देश्वरांनी सामुहिक विवाह सोहळा लावून दिला. अन्नदासोह सुरु केला. शहरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी श्रमदानातून सूमारे 45 एकर जागेवर तलावाची निर्मिती केली. त्यात 68 तीर्थांचे वास घडविले. 68 हजार वचने लिहून साहित्य विश्व समृध्द केले. त्यातील काही वचनेच आज उपलब्ध आहेत. त्या वचनांवर संशोधन सुरु आहे.
सिद्धेश्वर यात्रेतील परंपरा
12 व्या शतकात स्वःता सिध्देश्वरांनी कुंभार कन्येचा आपल्या योगदंडाशी विवाह लावून दिला होता. हा सोहळा जानेवारी संम्मती भोगीच्या दिवशी पार पडला होता. त्यासाठी सिध्देश्वर महाराजांनी 68 लिंगांना तैलाभिषेक घालून अक्षता सोहळ्याला आमंत्रण दिले होते. दुसऱ्या दिवशी सिध्देश्वर मंदिर परिसरातील संम्मती कट्टाजवळ नंदीध्वजांच्या उपस्थित अक्षता सोहळा पार पडतो. सूमारे 3 लाखांहून अधिक भाविक या अक्षता सोहळ्यात सहभागी झालेले असतात. त्यानंतर संक्रातीच्या दिवशी नंदीध्वजांची हळद काढली जाते. सांयकाळी होम प्रदीपन सोहळा होतो. त्यानंतर किंक्रातींच्या दिवशी शोभेचे दारुकाम होऊन त्यानंतरच्या दिवशी कप्पडकळी म्हणजे नंदीध्वज वस्त्रविसर्जन होऊन यात्रेतील धार्मिक विधींची सांगता होते. अशी पंरपरा असलेली जगातील एकमेव यात्रा म्हणून ओळखली जाते.
मानकरींना महत्त्व
ही यात्रा मानकरी यांची यात्रा म्हणून ओळखली जाते. हिरेहब्बू, देशमुख, शेटे, कुंभार, मेंगाणे, थोबडे, दर्गोपाटील, कुंभार अशा घराण्यांना यात्रेत विशिष्ट पुजेचा, सेवा करण्याचा मान आहे. ती परंपरेनुसार चालत आलेली आहे. यात्रेत कुणी कुणाला आदेश देत नाही. यात्रा कालावधीत सुमारे 17 किलोमीटर 68 शिवलिंगांसाठी प्रदक्षिणा घालण्यात येतो. यात विडा देण्याचा, विडा घेण्याचेही मानकरी परंपरेनुसार ठरलेले आहेत. विडा म्हणजे पूजा झाल्यानंतर खोबरे, खारिक, बदाम, ऊस, गाजर आदी मानकऱ्यांना देणे.